बोधकथा / दुधाचा ग्लास
दुधाचा ग्लास
एक छोटा मुलगा घरोघर
लहानसहान वस्तू विकत फिरत असे. आपल्या आईला मदत व्हावी व शाळेचा खर्च भागवण्यासाठी
तो मिळेल ते काम आनंदाने करत असे. एके दिवशी असाच तो वस्तू विकण्यासाठी
उन्हातान्हात फिरत होता. न जेवताच घरातून बाहेर पडल्याने त्याला खूप थकल्यासारखे
वाटू लागले. त्यामुळे एखाद्या घरी काही खायला मागून बघावे असे त्याने ठरवले. एका
घरासमोर थांबून त्याने दाराची बेल वाजवली. एका मुलीने दार उघडले.मुलाने पिण्यासाठी
ग्लासभर पाणी मागितले.त्याची अवस्था बघून मुलीने मोठ्ठा ग्लास भरून दूध आणून
मुलाला दिले. भुकेने व्याकूळ झालेल्या मुलाला दुधाचे पैसे कसे चुकवावे हा प्रश्न
पडला. परंतु ती तरुणी म्हणाली, 'मला याचे पैसे नकोत.'
तिचे मनापासून आभार मानून तो तेथून निघून गेला.
या प्रसंगानंतर अनेक
वर्षे लोटली. ती मुलगी मोठी झाली. अचानक ती आजारी पडली व तिला एका असाध्य रोगाने
ग्रासले. तिच्या घरच्यांनी अनेक डॉक्टरांना दाखवले. परंतु तिच्या तब्येतीत काही
सुधारणा होईना.शहरातील सर्वात मोठ्या हॉस्पिटलमधे तिलाअँडमिट करण्यात आले. तेथील
डॉक्टर हे सुप्रसिद्ध व सर्वात महागडे होते. त्यांनी त्या तरुणीवर योग्य उपचार
केले. तिचा आजार हळूहळू बरा होऊ लागला. परंतु डॉक्टरांची मोठ्या रकमेची फी कशी
चुकवावी या विवंचनेत ती तरुणी होती. तिच्या कुटुंबाकडे पुरेसे पैसे नाहीत हे
तिलाही माहीत होते.अनेक महिन्यांच्या उपचारानंतर त्या मुलीच्या हाती हॉस्पिटलचे
बिल देण्यात आले. तिच्या आवाक्याबाहेरील रकमेचे बिल खोडून ने कॅन्सल केलेले होते व
त्या खाली डॉक्टरांच्या सहीजवळ लिहिलेले होते, ‘ग्लासभर
दुधाने तुमचे बिल खूप वर्षांपूर्वीच चुकते केलेले आहे.' तो
छोटा मुलगा म्हणजेच आपल्याला बरे करणारे आहेत हे बघून त्या तरुणीच्या डोळ्यातून
आनंदाश्रू वाहू लागले. मुलांनो,कुठल्याही स्वार्थाशिवाय
केलेले चांगले काम कधीही वाया जात नाही, म्हणून
निःस्वार्थपणे चांगली कामे करत राहावे.










