बोधकथा
कठिण समय येता...
कुंजवनातल्या त्या सशाला खूप खूप मित्र होते. त्या गोष्टीचा त्याला अभिमानही वाटायचा. "कधी काळी आपला एखादा वैरी निर्माण झाला तर आपल्या मित्रांसह आपण त्याचेवर तुटून पडू की यंव...."
'फडशाच पाडू लोकांचा!" ससा म्हणे आणि त्याचे मित्रही मान डोलवित. "
एकदा त्या वनात एक पारधी आला. त्याच्या बरोबर वाघ्या नावाचा शिकारी कुत्रा होता. त्याने गुलजार सशाला पाहिले व पाठलाग आरंभिला. सशाने आपल्या मित्रांकडे धाव घेतली. आधी तो घोडया कडे गेला. घोडा आरामात चरत होता. "घोडेदादा, मला आपल्या पाठीवर बसवून पळवा ना . माझ्या मागे तो शिकारी कुत्रा लागलाय हो ! नेता का ?"
"छे, छे, छे! मला तर आता घरी गेलं पाहीजे. माझी बायको आजारी आहे म्हटलं..." असे म्हणून घोडोबा ताड-ताड टापा वाजवित निघून गेला.
"गाई ताई, आपल्या छोट्या मित्राला मदत करा हो ! टोकदार शिंगांनी सामना करा ना त्या मेल्या कुत्र्याशी..."
"नाही रे बाबा! माझा तान्हा वाट पाहत असेल. पान्हा कसा आवरू? त्याला दूध पाजलं पाहिजे!" हलत डुलत गाय निघून गेली. मग ससा गेला मेंढीकडे. याचना केल्यावर उत्तर मिळाले, "ससोबा, तू काय नि मी काय! दोघांनाही कुत्र्यापासून खरोखरच भय. मी रे कशी वाचवू तूला ? त्यातून मी तर बाई माणूस." सशाच्याने पुढे ऐकविले नाही. त्याने मागे वळून पाहिले. वाघ्या कुत्रा अगदी जवळ येऊन ठेपला होता. तेव्हा शेवटचा उपाय म्हणून ससोबांनी झपाट्याने वाट फुटेल तिकडे धूम ठोकली.थोडयाच अवकाशात ससा कुठल्या कुठे, वाघ्यापासून दूर सुरक्षित स्थळी जाऊन पोहोचला. त्याचे पायच त्याचे खरे मित्र बनले होते. सर्व खरे मित्र म्हणवणारे शत्रूच ठरले होते.
बोध :- सुखात सगळे सोबती असतात, दुःखात मात्र कोणीही नसते.
