दैनिक अभ्यास

माझी शाळा -माझा अभ्यास

Online Education

Class 1 st to 10 th

Breaking

शुक्रवार, ११ जून, २०२१

चंदनचोर व तेनालीराम

  


चंदनचोर व तेनालीराम 

              राजाच्या दरबारात आज शाही भोजनाचा कार्यक्रम होता. प्रतिष्ठित राजदरबारी या भोजनास उपस्थित होते. हास्य विनोदात सर्वांनी भोजन घेतले. राजाने विचारले, “प्रधानजी भोजन कसे वाटले ?”

 "अतिशय रूचकर. शाही भोजन म्हटल्यावर ते उत्तमच असणार. "

इतर दरबारी सुद्धा या भोजनाची स्तुती करीत होते.

राजाने तेनाली रामला विचारले, "तेनाली राम, तू नाही सांगितलेस भोजन कसे होते ते?"

"मी तरी वेगळं काय सांगणार ? सुग्रास भोजन होते. "

"मग पोटभर जेवलास की नाही ?"

"मी चार घास कमीच जेवतो.

असे करण्याचे कारण काय ?"

"चार घास भुकेपेक्षा कमी खावे म्हणजे अन्नपचन होते. शिवाय मला जेवणानंतर थोडे फार

फिरण्याचीही सवय आहे." प्रधान म्हणाले, “तेनाली राम, आता रात्र खूप झाली आहे. थंडीसुद्धा खूप आहे. कुठे जातोस रात्रीच्या वेळी चालत घरी ? झोप इथेच. "छे छे, माझी जेवणानंतर चालण्याची सवय मी कशाला मोडू ? आज तर मी आनंदात आहे. "

राजाने विचारले, “कशाचा आनंद झालाय तेनाली राम ?"

'आज पौर्णिमा आहे. शुभ्र चांदणे पडले आहे. चांदण्यात फिरण्यात मौज असते.” “एवढी मौज वाटते तुला ?"

महाराज, आपणसुद्धा या पौर्णिमेच्या रात्री माझ्याबरोबर फिरायला चला. आपणाससुद्धा आनंद मिळेल. "

प्रधान आणि काही दरबाऱ्यांना हे आवडले नाही. राजा जर फिरायला बाहेर पडला त आपणालासुद्धा नाइलाजाने त्यांच्याबरोबर जावे लागणार हे ओळखून प्रधानजी म्हणाले. "तेनाली राम अरे, थंडी किती पडली आहे! महाराज अशा थंडीत कसे बाहेर येतील ?"

"महाराजांनी उबदार कपडे घालावेत. "

"पण पौर्णिमेच्या रात्री असे कशाला फिरावे त्यांनी ?" "महाराज, आपणास पौर्णिमेच्या रात्री फिरण्यात किती मौज असते हे जाणून घ्यायचे तर येऊ शकता माझ्याबरोबर "

राजा म्हणाला, "ठीक आहे तेनाली राम, आपण जाऊ फिरायला." राजा प्रधानजीला म्हणाला, "प्रधानजी आम्हा दोघांसाठी चांगले घोडे

"ठीक आहे महाराज. जशी आपली आज्ञा."

     असे म्हणून प्रधानजीने दोन उमदे घोडे आणले. दोन घोड्यांवर दोघे स्वार झाले. ते चांदण्या रात्री फेरफटका मारू लागले. त्यांच्यासोबत प्रधान आणि इतर काही लोकसुद्धा होते. तेनाली रामने विचारले, “महाराज, कशी वाटली चांदण्यातली सैर ?"

"खूप छान वाटली. "

महाराज, आता इथून पुढे जंगल आहे. जंगलात चांदण्या रात्री फिरणे जास्तच मौजेचे असते."

प्रधान म्हणाला, "तेनाली राम, तूजा जंगलात फिरायला. यावेळी महाराज येणार नाहीत तिकडे.'

राजा उत्तरला, "काय हरकत आहे जायला ?"

प्रधान म्हणाला, “महाराज, अशा वेळी जंगलात जाणे धोक्याचे आहे.' "माझ्याबरोबर तुम्ही सारे आहात. जंगल फार मोठे नाही. तेथे जंगली प्राणीसुद्धा नाहीत. मग कसला धोका ? "

 

"महाराज, विनाकारण कशाला त्रास घेती ?" 'मला फारसा त्रास नाही होणार. फिरूया थोडा वेळ या जंगलात. "

राजाचे उत्तर ऐकून प्रधान गप्प बसला. तेनाली रामच्या घोड्यामागून राजाचा घोडा चालत होता. त्यांच्या मागून इतर सारे जात होते. अचानक समोरून चंदनाचे लाकूड घेऊन जाणाऱ्या बैलगाड्या दिसल्या.

राजा म्हणाला, "पकडा त्यांना सोडू नका.

राजाबरोबर येणाऱ्या सैनिकांनी त्या गाडीवानांना पकडले. ते सर्वजण खूप घाबरले होते.. राजाने विचारले, “तुम्ही कोण आहात ?"

त्या सर्वांचा प्रमुख म्हणाला, “महाराज, आम्ही गरीब लोक आहोत."

“ अरे, मग रात्रीच्या वेळी हे कसले काम करीत आहात ? पळून का जात होता ? "

तेनाली रामने गाडीतले लाकूड पाहिले. तो म्हणाला, "महाराज, हे तर चंदनाचे लाकूड आहे. हे लोक चंदनाचे लाकूड चोरून नेत आहेत. हे काम बेकायदेशीर आहे.

राजा म्हणाला, "या सर्वांना अंधारकोठडीत टाका.”

 एक गाडीवान म्हणाला, "महाराज, आम्ही फक्त जंगलाबाहेर हे लाकूड नेऊन देतो.आम्हाला फक्त मजुरी मिळते.”

"कोणी दिले तुम्हास हे काम ?"

“आपल्याच राज्यातील प्रमुख ठेकेदारांनी.

"चला मला दाखवा तो ठेकेदार. "

राजा त्या सर्व गाड्यांमागून जात राहिला. राजाला पाहताच ठेकेदार घाबरला.

राजा म्हणाला, “ठेकेदार, चंदन तू चोरतो आहेस ? तुला जन्मभर अंधारकोठडीत राहावे लागेल.'

ठेकेदार घाबरला. तो म्हणाला, "महाराज, मला क्षमा करा; पण मी चोर नाही. मी हुकमाचा नोकर आहे. मालकाच्या सांगण्यावरून मी हे काम करतो आहे. मला फक्त वाहतूक मजुरी आणि थोडी फार बक्षीस रक्कम मिळते. "

"तू कोणाच्या सांगण्यावरून हे काम करीत आहेस ?"

महाराज, मी त्यांचे नाव कसे सांगू ?' "

त्याचे नाव सांग नाहीतर तुला मृत्यूदंड होईल.”

तो ठेकेदार घाबरला. प्रधानजीकडे बोट दाखवून म्हणाला, “महाराज, हे सर्व मी प्रधानजींच्या सांगण्यावरून करतो.”

प्रधानजी घाबरला.

राजा म्हणाला, "या प्रधानजीला अंधारकोठडीत टाका. नंतर सर्व चौकशी रीतसर केली.जाईल. "

तेनाली राम म्हणाला, “महाराज, ही गोष्ट मला ठाऊक होती. आपला प्रधानजीवर पूर्ण विश्वास होता. प्रधान कसा चोर आहे हे कळावे म्हणूनच मी आपणास फिरण्याचे निमित्त काढून आणले होते. "

राजा खूश झाला. तो म्हणाला, “तेनाली राम, तुझ्या जागरूकतेमुळे आज चंदनचोर  सापडला. मी तुझ्या कामगिरीवर खूश आहे. “

आज तेनाली रामला फार मोठे समाधान मिळाले होते..

तात्पर्य :- शक्तीपेक्ष्या युक्तीनेही काम सहज सध्या होते.