दैनिक अभ्यास

माझी शाळा -माझा अभ्यास

Online Education

Class 1 st to 10 th

Breaking

शुक्रवार, ११ जून, २०२१

उंदीर आणि साप

 

उंदीर आणि साप

एका गावात एक गारुडी होता. एके दिवशी या गारुड्याने एक मोठा साप पकडला आणि बांबूच्या टोपलीत ठेवून त्यावर झाकण लावले. घरी येऊन गारुड्याने ही टोपली एका कोपऱ्यात ठेवून दिली.

              त्या गारुड्याच्या घरातच एक बीळ होते. त्या बिळात एक छोटा उंदीर राहत होता. रात्री घरातील सर्वजण ज्यावेळी झोपी गेले, तेव्हा हा उंदीर आपल्या बिळाच्या बाहेर आला आणि इकडून तिकडे, या डब्यावरून त्या डब्यावर हुंदडू लागला.

 

फिरताफिरता उंदराने एकदम एका बांबूच्या टोपल्यावर उडी मारली. उंदराला वाटले की, आज पहिल्यांदाच टोपली इथे आहे. नक्कीच या टोपलीत काहीतरी खाण्याची वस्तू असली  पाहिजे. टोपलीच्या आत मिठाई आहेअसे वाटून उंदराने झाकण उघडण्याचा खूप प्रयत्न केला. पण त्याला झाकण उघडता आले नाही.

              उंदीर उतावीळ होऊ लागला. काहीही करून त्याला त्या टोपलीच्या आत जायची घाई झाली होती. त्याने ठरवले की जरी झाकण उघडत नसले तरी आपल्या तीक्ष्ण दातांनी ते आपल्याला कुरतडता येईल. असा विचार करून उंदीर टोपली कुरतडू लागला.

            टोपलीच्या आत साप सावध झाला आणि योग्य संधीची वाट पाहत बसला. ज्याक्षणाला टोपलीला छिद्र पाडून उंदीर आत शिरला त्याच वेळी  सापाने उंदरावर झडप घालून त्याला गिळून खाऊन टाकले..

 

तात्पर्य : लक्ष्यात ठेवा उतावीळ होऊ नका व  विचारपूर्वक कृती करा.