जशास तसे
मोहनीश नावाचा
वाण्याचा एक तरुण मुलगा होता. त्याचा बाप खूप कर्ज करून मेला. त्याला व्यापारात
तोटा आला. मग त्याने घरदार विकून सर्व कर्ज फेडले व दुसऱ्या देशात जाऊन नशीब
काढावे या विचाराने गाव सोडण्याची तयारी करू लागला. जाण्यापूर्वी आपल्या वडिलांची
आठवण म्हणून ठेवलेला दहा शेराचा लोखंडी तराजू एका शेठजीकडे ठेवायला दिला व म्हणाला, 'शेठजी, ही वाडवडिलांची आठवण मी
तुमच्याकडे ठेवून जातो. मी परत आल्यावर हा तराजू मला परत द्या.'"अरे तू केव्हाही ये मोहनीश. तुझ्या तराजूला धक्का लागणार नाही.' शेठजीने म्हटले.मग मोहनीश
दुसऱ्या देशात भटकला. तिथे व्यापार करून तो आपल्या गावी काही वर्षांनी परत आला.
शेठजीकडे जाऊन तो म्हणाला, 'शेठजी, माझा तराजू आता मला परत द्या.
"अरे बाबा काय सांगू? तराजू अडगळीत ठेवला होता. पण घुशींनी तो खाऊन टाकला. 'शेठजी म्हणाला.'घुशींनी लोखंडाचा तराजू खाल्ला
असेल तर त्यात तुमचा काय दोष?'मोहनीश म्हणाला, 'मी परगावाहून आलो आहे. मला नदीवर आंघोळीला जायचे आहे. जरा
बादली आणि लोटा घेऊन श्रीपालला माझ्याबरोबर पाठवा.
'श्रीपाल शेठजीचा चौदा वर्षाचा मुलगा होता. शेठजीने श्रीपालला बोलावले व
म्हणाला, 'अरे श्रीपाल हे तुझे काका बरं का. नदीवर आंघोळीला जाऊन
देवदर्शन वगैरे करतील. जरा त्यांच्याबरोबर बादली आणि लोटा घेऊन जा.' शेठजींनी प्रमाणाबाहेर अगत्य दाखवल्याने मोहनीश मनात म्हणाला, 'माझा तराजू पचावा म्हणून अगत्य आहे. एरव्ही हा चेंगट माणूस
उष्ट्या हाताने कावळाही हाकलायचा नाही.'मग मोहनीश व श्रीपाल नदीवर
आले. मोहनीशने आंघोळ उरकली व देवळाकडे निघाला. त्या देवळात एक जुने तळघर होते.
बऱ्याच वर्षात त्या जुन्या देवळात कोणीच जात नव्हते. मोहनीश त्याच गावचा असल्यानं
त्याला तळघराची चोरवाट माहीत होती.
‘काका ते देऊळ फार जुने
आहे. तिकडे कोणीच जात नाही.' श्रीपाल म्हणाला,
'अरे पूर्वी मी याच देवाचं
दर्शन घ्यायचो. तेथे तळघरातही देवीची मूर्ती आहे. मी असताना तुला भ्यायची गरजच नाही. ' मोहनीशबरोबर श्रीपाल
तळघरात येताच मोहनीशने त्याला त्यात कोंडले व कडीही घातली.मग बादली व लोटा घेऊन तो
शेठजीच्या पेढीवर आला. मोहनीश एकटाच आलेला पाहून शेठजीने विचारले, 'अरे, माझा मुलगा कुठे आहे?' 'शेठजी मी नदीकाठी आंघोळ
करत होतो. श्रीपाल जरा दूर दगडावर बसला होता. तेवढ्यात एक घार आली आणि श्रीपालला
उचलून घेऊन गेली.' ‘तू लबाड बोलतोस!' शेठजी म्हणाला, 'घार कधी मुलाला उचलून नेते
का ? बऱ्या बोलाने सांग श्रीपाल कोठे आहे, नाहीतर कोतवालाकडे तक्रार करून तुझी चामडी लोळवल्यावर कबूल
होशील.'
‘अहो शेठजी!’ मोहनीश म्हणाला, “जर लोखंडाचा तराजू घुशी
खातात, तर मुलाला घार का नेऊ शकणार नाही ? मुलगा पाहिजे असेल तर माझा तराजू परत द्या.”
दोघांचा वाद वाढत गेला.
अखेर हे प्रकरण कोतवालाकडे गेले. कोतवालाने दोघांचे म्हणणे ऐकून घेतले. शेठजी
तावातावाने म्हणाला, 'या चोराने माझ्या लाडक्या
मुलाला पळवले आहे.’ तू याचा मुलगा आणून दे.' कोतवाल म्हणाला.'कसा आणू?' मोहनीश म्हणाला, 'माझ्या डोळ्यासमोर घारीने
त्याला उचलून नेला..' ‘तू खोटं बोलतोस!’ कोतवाल गरजला, 'घार कधी मुलाला उचलून नेईल
का?''का नाही नेणार?' मोहनीश म्हणाला, 'दहा शेर वजनाचा तराजू जर घुशी खाऊ शकतात तर हेही अशक्य नाही!''तराजू घुशींनी खाल्ला?" कोतवाल चक्रावला. तेव्हा
मोहनीशने सगळी घटना सविस्तर कोतवालाला सांगितली. कोतवाल हसू लागला. मग त्याने
शेठजीला तो तराजू मोहनीशला परत द्यायला लावला. तराजू मिळाल्यावर मोहनीश
देवळाखालच्या तळघरातून श्रीपालला आणले.'मैत्रीच्या नात्यातून
मोहनीशला फसवणाऱ्या शेठजींसारखी नीती नसावी .
तात्पर्य
:- शहाणा शत्रू एकवेळ बरा पण मूर्खाची संगत नसावी. जिथे आपले हित होते, तिथेच
अहित करू नाही .
