घातक सल्ला/बोधकथा
म एका अरण्यात पिंपळ वृक्षावर पुष्कळ कबूतरे राहात होती. दिवसभर त्यांचा दंगा चाले. पिंपळाला अनेक ढोली होत्या. त्यात कबूतरांची अंडी असायची. त्यापैकी एका ढोलीत एक सर्प राहावयास आला.
कबूतरे चारापाण्याला गेली. हा सर्प त्या कबूतरांची पिल्लं खाऊन टाकू लागला. सगळीकबूतरं त्याला भिऊन वागू लागली. कलकलाट करू लागली. त्यांचा प्रत्येक दिवस काळजी लावून उगवू लागला. त्यातील एका कबूतराला सर्पाच्या या त्रास देण्याच्या वृत्तीचा उद्वेग आला. तो तलावाच्या काठावर जाऊन उदासपणे बसून राहिला. तेथे राहणारा एक खेकडा जवळ येत म्हणाला, 'कबूतरदादा, आज असे उदास का?' 'काय सांगू बाबा!' कबूतर रडू लागले व म्हणाले, 'अरे माझी पिल्ली सर्पाने खाल्ली. तो आमच्याच झाडावरच्या एका ढोलीत राहायला आला आहे. त्याला कसे घालवावे किंवा मारावे या विचाराने मी हैराण झालो आहे. तुझ्याकडे काही उपाय असेल तर सांग.
'खेकडा मनात म्हणाला, 'दिवसभर हुल्लडबाजी करणारी बिनकामाची ही कबूतरे. केवढा दंगा करतात इथे. आता यांचाच काटा काढायची आयतीच संधी आली आहे.' तो उघडपणे कबूतराला म्हणाला, 'दादा असा जर त्रास असेल तर एक उपाय आहे. सर्पाचा शत्रू मुंगूस असतो हे तुम्हाला माहीत आहेच. तुम्ही मुंगसाच्या घरापासून ते त्या सर्पाच्या ढोलीपर्यंत मांसाचे तुकडे टाका. म्हणजे मांसाला भुलून मुंगूस सर्पाच्या ढोलीपर्यंत जाईल व सर्पाला सहज मारून टाकेल.' खेकड्याचे ऐकून कबुतरांनी मांसाचे खंड टाकले. त्याच्या वासाने मुंगूस आले व सर्पाला मारून टाकले. परंतु एकदा चटक लागल्यावर मुंगूस रोज येऊन कबूतरांनाच खाऊ लागले. अखेरीस सगळ्या कबूतरांचाही नायनाट झाला.
तात्पर्य :- उपाय करण्यापूर्वी अपायांचा विचार करावा
