आठवी मराठी पाठांचा आशय व कवितेचा भावार्थ
पाठ/कविता ६ ते ९
६.असा
रंगारी श्रावण//८ वी मराठी/ या कवितेचा
भावार्थसमजून घ्या :-
श्रावण महिन्यात निसर्गातील विलोभनीय व मनोहर दृश्यांचे वर्णन करताना
कवी ऐश्वर्य पाटेकर म्हणतात की- श्रावण हा
रंगांचा जादूगार आहे. तो सृष्टीमध्ये विविध रंग सतत उधळीत येतो. सृष्टीचा हा चित्रकार आपल्या दिव्य
कुंचल्याने हिरवा देखावा रेखाटतो.
श्रावण हा सुंदर कलाकार आहे. त्याची किमया काय सांगावी? हा किमयागार अजब आहे. जागोजागी निसर्गात जणू
त्याने चित्रांचीच रांग मांडली आहे. सर्वत्र पंगतीत बसलेली चित्रे आहेत.
हा श्रावण दरी खोऱ्यात, डोंगरात
नाचतो; नदीबरोबर झिम्मा खेळतो; रिमझिम सरींचे मधुर गाणे तो झाडांशी बोलतो.
वेलींच्या तो जेव्हा वेण्या घालतो, तेव्हा वेली लाजून चूर होतात. (खूप लाजतात.) वेली मग पानाफुलांचे
पातळ नेसून थेंब ठसवून सजतात, नटतात.
पोरीबाळींना झोका घेण्यासाठी श्रावण झाडांना झुले टांगतो. त्यांना
झोके देतो. झुलवता झुलवता मुलींच्या गाण्यांना नादमय लय देतो.
लहान मुलांच्या खेळात श्रावण त्यांचा सवंगडी
होतो आणि दहीहंडीच्या काल्यात त्यांच्या संगे प्रेमाने संपूर्ण चिंब भिजलेला
बाळकृष्णच होतो.
शुभ्र उन्हात तो पावसाचे घर बांधतो आणि खोडकर श्रावण पावसाची खोड
काढून, मस्करी करून झाडामागे लपतो.
आकाशाच्या अफाट निळाईत श्रावण इंद्रधनुष्याचा सप्तरंगी बांध घालतो.
रंगीबेरंगी फुलांची नक्षी हिरव्या रानात सजवतो, ठसवतो.
असा हा कलावंत रंगारी श्रावण रंग उधळीत फिरतो
आणि हिरव्या निसर्गाच्या मळ्यात आपले घरटे बांधून राहतो.
७.अण्णाभाऊंची भेट या पाठाचा आशय / आठवी मराठी
मराठीतील प्रसिद्ध लेखक अण्णाभाऊ साठे हे मुंबई शहरात , घाटकोपर मधील चिरागनगर या झोपडपट्टीत राहत असत .त्याच
काळातील शाहीर विठ्ठल उमप यांचे कार्यक्रम
त्या काळात आकाशवाणीवर गाजत होते. अण्णाभाऊंना शाहीर उमपांना भेटण्याची खूप इच्छा
होती. उमपांना अण्णाभाऊंना भेटण्याची ओढ लागली होती. त्याचवेळी अण्णाभाऊंनी भिकाजी
तुपसौंदर यांच्यामार्फत चिरागनगरात येऊन भेटा असा निरोप विठ्ठल उमपांना पाठवला.
विठ्ठल उमप भेटण्यासाठी चिरागनगरात
गेले. तेथे जाण्यासाठीची वाट खाचखळग्यांची, ओबडधोबड
होती. सर्वत्र चिखल, दलदल व पाण्याची डबकी पसरलेली होती. चौकशी करीत
करीत उमप अण्णाभाऊंच्या झोपडीत पोहोचले. काळ्यासावळ्या वर्णाचे अण्णाभाऊ
घामेजलेल्या अंगाने बाहेर आहे. दोघेही झोपडीत गेले. मग बाहेरच असलेल्या एका
झोपडीतल्या चहावाल्याच्या हॉटेलात गेले. दोघांनाही एकमेकाला भेटल्याचा खूप आनंद झाला.
त्यानंतर पुन्हा एकदा विठ्ठल उमप अण्णाभाऊंच्या भेटीला
गेले. या वेळी त्यांना अण्णाभाऊंच्या झोपडीचे पूर्ण दर्शन घडले. झोपडीतच पाणी
साचलेले डबके होते. मोडके टेबल, मोडकी
खुर्ची हे फर्निचर त्या झोपडीत होते . घरात एकच तांब्या, एकच अॅल्युमिनियमचे ताट, एकच डेचकी एवढीच भांडीकुंडी होती. अण्णाभाऊंचा
पोशाख म्हणजे एकच सदरा व एकच धोतर .
अण्णा हे त्याकाळातील प्रसिद्ध
लेखक होते. एक प्रकाशक आला आणि केवळ एक ट्रॅन्झिस्टर देऊन त्यांचे लेखन घेऊन गेला.
त्यांच्या कथा-कादंबऱ्या रशियन भाषेत अनुवादित झाल्या होत्या. त्यांची अमाप
रॉयल्टी मॉस्कोतल्या बँकेत पडून होती. अण्णा ती घेतच नव्हते. पैसा आला की आपण
वास्तवापासून दूर जाऊ, सकस
साहित्य निर्माण करता येणार नाही, गरिबांची
दुःखे आपल्याला वेशीवर टांगता येणार नाहीत, अशी अण्णाभाऊंना मनातून भीती वाटत होती.अशी ही भेट उमपांना कायम
लक्ष्यात राहिली .मोठ्या माणसांचे मोठेपण हे त्यांच्या राहणीमानात नसून त्यांच्या
मोठ्या विचारात असते .
८ . धाडसी कॅप्टन : राधिका मेनन या पाठातील महत्त्वाचे
मुद्दे
१. कॅप्टन राधिका मेनन यांचे संपूर्ण हे बालपण केरळमधील कोदुनगलर या गावी गेले. धाडस आणि
हिंमत हे गुण त्यांच्या व्यक्तिमत्त्वात लहानपणापासूनच दिसत होते. सागर आणि किनारा यांचा परिचय
लहानपणापासूनच घडला असल्याने सागरसफरीची तीव्र इच्छा त्यांच्या मनात निर्माण झाली.
यातूनच पुढे नौसेनेत सामील होण्याची महत्त्वाकांक्षा त्यांच्या मनात आकाराला आली.
४. राधिका आपल्या ताफ्यातील साथीदारांसह बचाव कार्यासाठी तयार झाल्या. वादळाचा जोर प्रचंड असल्यामुळे राधिका
यांचे जहाज मच्छीमारांच्या होडीपर्यंत पोहोचू शकले नाही. त्यांचे दोन प्रयत्न
अपयशी ठरले.
५. तिसऱ्या वेळी मात्र राधिका व त्यांचा टीमने
यांनी निकराने प्रयत्नांची शर्थ केली.
सत्तर सागरी मैल या वेगाने वादळ घोंघावत होते आणि समुद्राच्या लाटा नऊ-नऊ मीटर
उंचीपर्यंत उसळत होत्या. अखेरीस यश मिळाले. होडीवरील सर्व मच्छीमारांची सुटका
झाली.
६. या कामगिरीसाठी त्यांना आंतरराष्ट्रीय मेरीटाइम संघटनेने 'अॅवॉर्ड फॉर एक्सेप्शनल ब्रेव्हरी अॅट सी' हा पुरस्कार देऊन राधिका मेनेन यांना सन्मानित
केले.
______________________________________________९. विद्याप्रंशसा या कवितेचा भावार्थ / ८वी मराठी
विद्येची थोरवी सांगताना
कवी म्हणतात या जगामध्ये माणसाला विद्येमुळेच इतर प्राण्यांपेक्षा श्रेष्ठ लाभले
आहे. जी . विदयेमुळे प्राप्त होत नाही, अशी
गोष्ट जगामध्ये नाही. विदयेमुळे मनुष्याला कोणतीही गोष्ट मिळू शकतात . ॥१॥
ज्ञान
व विद्या अशी गोष्ट आहे की जी दुसऱ्याला दिल्याने किंवा स्वतः उपभोगल्यामुळे कधीही
कमी होत नाही, उलट ती सतत वाढतच राहते. विदया ही अक्षय आहे.
अशी ही एकच विदयासंपत्ती आहे. तिच्यामध्ये असलेला हा विलक्षण गुण दुसऱ्या कुठल्याच गोष्टीत नाही. ||२||
जगामध्ये तऱ्हेतऱ्हेचे, निरनिराळे बेसुमार असे रत्ने, हिरे, माणके, मोती व सोने यांचे अलंकार आहेत. पण विदयेसारखा
शोभिवंत अलंकार दुसरा एकही नाही. विदया
अलंकार एकमेव व अद्वितीय असा आहे. ||३||
या सर्व पृथ्वीतलावर, सर्व जगात विदयेसारखा कल्याणकारी व शुभचिंतक
मित्र नाही. ज्याला विदया अनुकूल आहे, वश' आहे, त्याला
नेहमी कशाचीही कमतरता भासत नाही. ॥४॥
विद्या ही गुरूप्रमाणे उपदेश करते.
संकटात मार्ग दाखवते. संकट कसे निवारण करायचे याचे उपाय सुचवते. कल्पतरू जसा
तुम्ही इच्छिलेले फळ देतो,
यशदायी ठरतो, त्या कल्पतरूप्रमाणे विद्या ही तुमची मनोकामना पूर्ण करते. ।।५।।
अशा प्रकारे सर्व सुखे देणारी व
सर्व दुःखे हरण करणारी ही विद्यादेवता आहे. तिची मनोभावे नेहमी उपासना करावी.
अनन्यभावाने तिला शरण जावे. तिची खूप साधना करावी. ॥६॥
