दैनिक अभ्यास

माझी शाळा -माझा अभ्यास

Online Education

Class 1 st to 10 th

Breaking

रविवार, २३ मे, २०२१

मृदा / 7 वी /भूगोल


मृदा / 7 वी /भूगोल 

            या पाठाचे काळजीपूर्वक वाचन,अभ्यास करा व यावर आधारित खालील ऑनलाईन टेस्ट सोडवा .टेस्ट मनोरंजक असून  आपल्या विद्यार्थी मित्रांना नक्की आवडेल.  टेस्ट २० गुणांची असून १० प्रश्न आहे.नियमित सरावासाठी येथे भेट द्या https://www.swadhya.in/ 


वाचा व लक्ष्यात ठेवा -

विषुववृत्तापासून ध्रुवांपर्यंतचे नैसर्गिक प्रदेश :

(१) टुंड्रा प्रदेश : हा प्रदेश सुमारे ६५° ते ९०° उत्तर अक्षवृत्तांच्या दरम्यान आहे. या प्रदेशात अतिशय थंड हवामान आढळते. या प्रदेशात अल्पकाळ टिकणाऱ्या वनस्पती आढळतात. या प्रदेशात कॅरिबूरेनडिअरध्रुवीय अस्वलकोल्हासील मासे व वॉलरस मासे इत्यादी प्राणी आढळतात. या प्रदेशात लोकसंख्या अतिविरळ आढळते.

(२) तैगा प्रदेश : हा प्रदेश सुमारे ५५° ते ६५° उत्तर अक्षवृत्तांच्या दरम्यान आहे. या प्रदेशात उन्हाळ्यात पाऊस व हिवाळ्यात हिमवृष्टी होते. या प्रदेशात प्रामुख्याने सूचिपर्णी वने आढळतात. या प्रदेशातील प्राण्यांच्या अंगावर दाट व मऊ केस असतात. या प्रदेशात कमी लोकसंख्या आढळते.

(३) गवताळ प्रदेश (स्टेप्स व प्रेअरी) : हा प्रदेश सुमारे ३०° ते ५५° उत्तर व दक्षिण अक्षवृत्तांच्या दरम्यान खंडांच्या आतील भागात आढळतो. या प्रदेशात बहुतेक पाऊस उन्हाळ्यात पडतो. या प्रदेशात प्रामुख्याने गवताची विस्तीर्ण कुरणे आढळतात. या प्रदेशात प्रामुख्याने तृणभक्षक प्राणी आढळतात. गुरे चारणे (पशुपालन) हा या प्रदेशातील लोकांचा मुख्य व्यवसाय आहे. या प्रदेशात मोठ्या प्रमाणावर गव्हाची शेतीही केली जाते.

(४) उष्ण वाळवंटी प्रदेश : हा प्रदेश विषुववृत्तापासून २०° ते ३०° उत्तर व दक्षिण अक्षवृत्तांच्या दरम्यान आहे. या प्रदेशात दिवसा अतिउष्णता असते व रात्री खूप थंडी पडते. या प्रदेशात अत्यल्प पर्जन्य पडतो. या प्रदेशात प्रामुख्याने कमीत कमी पाने असलेल्या व काटेरी वनस्पती आढळतात. या प्रदेशात उंट हा प्राणी आढळतो. या प्रदेशातील लोक आपल्या अनेक गरजा जनावरांपासून पूर्ण करतात.

(५) गवताळ प्रदेश (सुदान) : हा प्रदेश विषुववृत्ताच्या उत्तरेस ५° ते २०° अक्षवृत्तांच्या दरम्यान आहे. या प्रदेशातील उन्हाळा उष्ण व दमट आणि हिवाळा उबदार व कोरडा असतो. या प्रदेशात प्रामुख्याने उंच व दाट गवत आढळते. या प्रदेशात तृणजीवी व मांसभक्षक प्राण्यांची विपुलता आढळते. शिकार व पशुपालन हे या प्रदेशातील लोकांचे प्रमुख व्यवसाय आहेत..

(६) विषुववृत्तीय प्रदेश : हा प्रदेश विषुववृत्ताच्या उत्तरेस व दक्षिणेस ०° ते ५° अक्षवृत्तांच्या दरम्यान आहे. या प्रदेशात उष्ण व दमट आणि रोगट हवामान आढळते. या प्रदेशात घनदाट सदाहरित वने आढळतात. या प्रदेशातील प्राण्यांमध्ये खूप विविधता आढळते. या प्रदेशात कमी लोकवस्ती आढळते.

नैसर्गिक  प्रदेश व व्यवसायातील विविधता :

(१) मान्सून प्रदेश : मान्सून प्रदेशात शेती व शेतीपूरक व्यवसाय केले जातात.

(२) विषुववृत्तीय प्रदेश : विषुववृत्तीय प्रदेशात वनोत्पादनावर आधारित लाकूडकटाई व डिंकमधरबरलाख इत्यादी पदार्थ गोळा करण्याचे व्यवसाय केले जातात.

(३) तैगा प्रदेश : तैगा प्रदेशातील वनांमध्ये मऊ लाकूड आढळते. त्यामुळे तेथे प्रामुख्याने लाकूडतोड व्यवसाय चालतो.

(४) टुंड्रा प्रदेश : टुंड्रा प्रदेशात केवळ शिकार व मासेमारी हे व्यवसाय केले जातात..

(५) गवताळ प्रदेश : गवताळ प्रदेशात अलीकडे विस्तीर्ण शेतीचा व्यवसाय केला जातो.

__________________________________________

नैसर्गिक साधनसंपत्तीचा वापर :

(१) वेगवेगळ्या नैसर्गिक प्रदेशांत पर्यावरण व उपलब्ध नैसर्गिक साधनसंपत्तीत खूप फरक पडतो.

(२) नैसर्गिक साधनसंपत्तीचा वापर हा त्या त्या प्रदेशांतील विज्ञानाच्या आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीवर अवलंबून असतो. त्याचप्रमाणे त्या प्रदेशाचा इतिहास व सांस्कृतिक जडणघडण यांचाही नैसर्गिक साधनसंपत्तीच्या वापरावर व लोकजीवनावर प्रभाव असतो.

वसुधैव कुटुंबकम् :

(१) नैसर्गिक साधनसंपत्तीवर केवळ मानवाचेच नव्हे तर पृथ्वीवरील इतर सर्वच सजीवांचे जीवन अवलंबून असते.

 (२) त्यामुळे नैसर्गिक प्रदेशातील साधनसंपत्तीचा वापर करताना आपण आपल्याबरोबरच इतर सजीवांचा देखील विचार करणे आवश्यक आहे. तरच 'वसुधैव कुटुंबकम्ही कल्पना प्रत्यक्षात येऊ शकेल.