माधवची हुशारी
वादळामुळे घर व गाव उद्ध्वस्त झाल्यामुळे माधवने त्याच्या कुटुंबासह
दुसऱ्या गावातील मंदिरात आश्रय घेतला. एक दिवस कसाबसा गेला. कुठे काम मिळतेय का
बघावे व मुलाला खायला काहीतरी आणावे म्हणून माधव गावातील घरोघर जेवण मागत फिरू
लागला. त्याच्या अंगावरील मळके-फाटके कपडे बघून लोक त्याला भिकारी समजून हाकलून
देत होते. कुणी काम दिले नाही. सायंकाळी मंदिराच्या पुजाऱ्याने काही
अंथरुण-पांघरुण दिले व देवाला दान केलेले कपडे घालण्यास दिले.
दुसऱ्या दिवशी माधव ते नवे कपडे घालून कुठेकाम
मिळतेय का हे शोधण्यास पुन्हा गावात गेला.पुन्हा कालच्या घरासमोर थांबून आवाज देऊ
लागला. घरातील मालकाने त्याला बघितले व माधवला आदराने घरात बोलावले. त्याला
जेवायला बसवले. घरात बनवलेले चांगले गोडधोड जेवण वाढले. काही क्षण थांबून माधवने
सर्व पदार्थांचे घास बनवले व ते अंगातील नवीन कपड्यांना दाखवून 'खा.... खा.... असे म्हणू लागला. त्याचे विचित्र वागणे बघून
घरमालकाने कारण विचारले तेव्हा माधव म्हाणाला, 'आजचे हे गोडधोड जेवण मला मिळाले नसून माझ्या या
नव्या कपड्यांकडे बघून मिळाले आहे.
काल आपण मला जे भिकारी समजून हाकलले होते, पण आज कपड्यांना बघून पाहुणचार करताय म्हणूनच
या कपड्यांना जेवण घालण्याचा प्रयत्न करतोय. वादळात झालेल्या नुकसानीमुळे माझ्यावर ही । परिस्थिती आली आहे.' माधवचे
बोलणे ऐकून मालकाला आपली चूक लक्षात आली. तो भला माणूस निघाला. त्याने माधवला राहायला
जागा दिली व कामही मिळवून दिले.
• तात्पर्य : यातून आपण शिकलो की महत्त्व माणसाला द्यावं, त्याच्या
कपड्यांना किंवा वस्तूंना नाही.
